Twitter

Follow palashbiswaskl on Twitter
Follow palashbiswaskl on Twitter

Saturday, February 25, 2012

शिवसेना - भाजपमध्ये बेबनाव!

शिवसेना - भाजपमध्ये बेबनाव!


नागपूरमध्ये बसपला उपमहापौरपदाचे गाजर ' नाशिक  महापौरपदासाठी मनसेला अनुकूलता
प्रतिनिधी,२४ फेब्रुवारी / मुंबई
altस्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि विशेषत: मुंबई महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत लक्षणीय यश मिळाल्याने भाजप अधिकाधिक आक्रमक झाला असून त्यांनी शिवसेनेला खिंडीत पकडण्याची तयारी केली असल्याचे संकेत मिळत आहेत. नागपूरमध्ये मुस्लिम लीगचे समर्थन मिळवण्याचा तसेच  उपमहापौरपदाचे गाजर दाखवून बसपचा पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न करणे तर नाशिकमध्ये मनसेचा महापौर बसविण्यास अनुकूलता दर्शविणे या भूमिका शिवसेनेला जाचक ठरत असल्या तरी भाजपने त्याकडे दुर्लक्ष करून आपलेच घोडे पुढे दामटविण्याचे ठरविल्याने गेल्या अडीच दशकांहून अधिक काळ असलेल्या शिवसेना-भाजप युतीमध्ये बेबनाव निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.
शिवसेनेने महायुती करताना आम्हाला विचारात घेतले नाही, रिपब्लिकन पक्षाच्या काही नेत्यांकडून भाजपचा जातीयवादी शक्ती म्हणून उल्लेख करण्यात आला. तरीही शिवसेनेमुळे भाजपने महायुती करण्यास दाखविलेली अनुकूलता आणि त्यानंतर जागावाटपाच्या वेळी झालेली वादावादी या बाबी ताज्या असतानाच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी शिवसेनाप्रमुखांपर्यंत आपले दूरध्वनीच पोहोचत नसल्याचे केलेल्या वक्तव्यामुळे युतीमधील दरी अधिक रुंदावत चालल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
भाजपमध्ये आता अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, स्व. प्रमोद महाजन यांच्यासारखे नेते राहिलेले नाहीत, अशी टीका शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अलीकडेच केली होती. त्यामुळे खदखदत असलेला असंतोष गडकरी यांनी शिवसेनाप्रमुखांपर्यंत आपले दूरध्वनी पोहोचत नसल्याचे मत व्यक्त करून काढला असे बोलले जाते. इतकेच नव्हे तर शिवसेनेच्या मुखपत्रातून भाजप आणि पक्षाच्या नेत्यांवर टीका करताना जी भाषा वापरली जाते त्याचा स्तर अत्यंत खालचा असल्याचेही गडकरी यांनी नमूद केले आहे.
गडकरी यांच्या टीकेला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिलेले उत्तर आणि राऊत यांच्या मतावर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी राऊत यांना दिलेला सल्ला याचे पडसादही दोघांमधील नात्यांमध्ये दरी रुंदावण्यास पोषक ठरत आहेत.  त्यातच नागपूर महापालिकेत भाजपचा महापौर विराजमान होण्यासाठी शिवसेनेसोबतच भाजपने मुस्लिम लीगचा घेतलेला पाठिंबा शिवसेनेला रुचलेला नाही. बसपाचाही पाठिंबा मिळविण्याचे प्रयत्न भाजपने सुरू केल्याने शिवसेना नेते अधिकच संतप्त झाले आहेत. राज्यासमवेतच त्याचे पडसाद उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत उमटू नयेत यामुळे बसपाने अद्याप पाठिंबा जाहीर केलेला नसला तरी भाजपने बसपाचा पाठिंबा मिळविण्यासाठी केलेला प्रयत्नच शिवसेनेच्या जिव्हारी लागला आहे.
राज्यात एक क्रमांकाचा शत्रू असलेल्या मनसेचा महापौर कोणत्याही ठिकाणी विराजमान होऊ नये, अशी शिवसेनेची इच्छा असताना भाजपच्या नेत्यांनी मात्र मनसेला पाठिंबा देऊन त्यांचा महापौर बसविण्यास अनुकूलता दर्शविली आहे.  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना भाजपच्या प्रदेश कार्यालयात चहापानासाठी पाचारण केल्यामुळे शिवसेना नेत्यांनी भाजपच्या नेत्यांना दूषणे दिली होती. निवडणुका जाहीर झाल्यापासून ते निवडणुकांचे निकाल लागेपर्यंत भाजपच्या पोटात खदखदत असलेला हा असंतोष आता बाहेर येऊ लागला आहे. मुंबईत रिपब्लिकन पक्षाला जागा देण्यासाठी युतीमधील ज्या पक्षाने गेल्या वेळी जास्त जागा लढविल्या होत्या त्यांनी नव्या मित्रासाठी जास्त जागा सोडाव्या, अशी आक्रमक भूमिकाही भाजपने घेतली होती. भाजप गेल्या काही दिवसांपासून विशेषतच: शिवसेनेबाबत अधिकाधिक आक्रमक होत असल्याने अभेद्य युतीला तडे जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Welcome

Website counter

Followers

Blog Archive

Contributors